Wednesday, June 30, 2021

नाम:स्मरण

 नाम:स्मरण


नाम हे केव्हाही , कुठेही कोण्याही ठिकाणी घेता येते. त्याला कोणतेही बंधन नाही..म्हटलेच आहे: -


अहो येता जाता , उठता बसता कार्य करता

सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता

घरी दारी शय्येवरी बहु सुखाचे अवसरी

*समस्यांची लज्जा त्यजुनी भगवचिंतन करी *


नामाने चित्ताची शुद्धी होते आणि स्वस्वरूप स्थिती प्राप्त होते . श्रीमंत दासबोध दशक चार , समास तीन मध्ये नामःस्मरण भक्तीची थोरवी मध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात : -


नामे संकट नासती नामे विघ्ने निवारती ,

नाम स्मरणे पाविजेती उत्तम पदे |


नामःस्मरणाने वाल्याचा वाल्मिकी वृशी झाला , प्रल्हाद नाना आघातापासून सुटला अजामेळ मुक्त झाला . शंकराने विष प्राशन केले तेव्हा  त्यांच्या अंगाची लाही लाही होत होती . राम नामाने ती शांत झाली . म्हणूनच तुकाराम महाराज प्रश्न करतात : -


नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला ,

सांगा विनवितो तुम्हासी , संत महंत सिद्ध ऋषी

नामे तरला नाही कोणा ऐसा ध्यावा निवडून

सलगीच्या उत्तरा , तुका म्हणे क्षमा करा ||


नामःस्मरण भक्तीची अनंत फळे एकनाथ महाराजांनी भागवतात वारंवार सांगितली आहे .


नाम होईचे विरक्त , नामे निर्मळ होई चित्त

नामे साधे गुणातीत नामे निर्मुक्त भवपाश

नामी लोलंगीत चित्त भवभय रिघो न शके तेथ

नामी विश्वास ऐसा जेथ भगवंत तेथे तुष्ठला ||


कली-युगात सर्वांनाच सहजपणे , सुलभपणे सरळपणे हि तीन शक्य असणारी नामःस्मरण भक्ती तितकीच प्रभावशाली नि सिद्ध अशीच आहे , म्हणूनच सर्व संत महात्मे ह्या भक्तीचाच प्रचार करतात . अंतःकरणाने स्मरण करताच सद्गगुरु आपल्या भक्तासाठी प्रकट होतात ह्यापेक्षा नाम-स्मरणाचे फलित आणखीन काय सांगावे !

---------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

पहाटेची_अमर्याद_ताकद

 # पहाटेची_अमर्याद_ताकद ...💪💪💪 तुम्ही सकाळी किती वाजता उठता?   झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज पहाटे लवकर उठायला हवं! मोठी माणसं सा...