दत्तगुरूंच्या पादुकांचे महत्त्व
श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या मूळ-पादुका तीन ठिकाणी आहेत. संन्यास घेऊन ते जेव्हा घराबाहेर पडले, तेव्हा प्रथमत: ते औदुंबर येथे आले. तेथे त्यांनी पहिला चातुर्मास करून अनुष्ठानाला प्रारंभ केला. तेथे त्यांनी आपल्या पादुका ठेवल्या. त्या पादुकांना ‘विमलपादुका’ असे म्हटले जाते. विमल म्हणजे स्वच्छ, निर्मळ, शुद्ध असा भावार्थ होतो. म्हणजेच येथील अनुष्ठानापासूनच त्यांनी आपल्या स्वत:साठी नव्हे, पण आम्हाला-तुम्हाला तेथील अनुष्ठानाचे महत्त्व कळावे यासाठी उपासनेतील शुद्ध, निर्मळ, स्वच्छ अशा अंतर्मनाचे स्वरूप त्यातून सूचित केले असावे. कारण अनुष्ठानासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट हीच असते. उपासनेची प्रगती ही अशा मनोधारणेतून होत असते. पुढे श्रीनृसिंहसरस्वती महाराज हे नरसोबाची वाडी येथे गेले. तेथे त्यांनी बारा वर्षे तप केले. तेथील पादुकांना ‘मनोहरपादुका’ असे म्हटले गेले आहे. का म्हणाल? तर तपश्चर्येने प्राप्त होणारी प्रसन्नता तिथे अभिप्रेत असावी. जेव्हा तपश्चर्या किंवा अनुष्ठान हे अधिकाधिक काळ होते, तेव्हा ही मनाची किंवा चित्ताची प्रसन्नता मुखावर विलसत असते. दत्तगुरूंचे हे प्रसन्न दर्शन घडून येऊन आपलेही मन प्रसन्न होते. ही प्रसन्नता आनंदस्वरूपही असते. त्याचे आणखीही एक कारण असे की, स्वत: श्रीगुरूंनी सांगितले की,
‘तुम्हासहित औदुंबर । आमुच्या पादुका मनोहर ।
पूजा करिती जे तत्पर । मनकामना पुरती जाणा ॥ (अ. १९ ओवी ८०)
त्यानंतर श्रीनृसिंह सरस्वतीमहाराज गाणगापूर येथे आले. प्रथम त्यांनी संगमावर चोवीस वर्षे अनुष्ठान केले. राजाने त्यांना गावात येण्याची प्रार्थना केली व वाजतगाजत गावात आणले. तेथेच सध्याचा मठ आहे. श्रीशैलपर्वतास जाऊन, पाताळगंगेपलीकडील कर्दळीवनात ते गुप्त झाले. पण त्यापूर्वी त्यांनी त्या मठात आपल्या पादुका ठेवल्या. त्यास ‘निर्गुणपादुका’ असे म्हटले जाते. निर्गुण म्हणजे परब्रह्मस्वरूप, तसेच गुणातीत अवस्थेतील अवतारित, असाही भावार्थ आहे. सत्त्व-रज-तम या त्रिगुणापलीकडे गेलेले हे अवतारी-सत्पुरुष परब्रह्माशीच एकरूप झालेले असतात. त्यांच्या निर्गुणपादुकांची पूजा-आराधना केल्यास निर्गुण-सगुण असे दर्शन होते.
सायंदेवांकडील ‘करुणा-पादुका’
श्रीनृसिंहसरस्वतीमहाराज यांचे चार पट्टशिष्य होते. ते म्हणजे सायंदेव, नंदिनामा, नरहरी, सिद्धमुनी- हे होत.सिद्धमुनी हे सतत महाराजांच्या बरोबरच वावरत असल्याने त्यांना अनेक हकिकती ठाऊक होत्या. त्या त्यांनी आपले शिष्य नामधारक यांना सांगितल्या. त्यामुळे सिद्धमुनी-नामधारक संवाद डोळयापुढे ठेवूनच सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्रग्रंथ लिहिला. “महाराजांनी आपल्या पादुका सायंदेव यांना पूजेसाठी दिल्या होत्या. सायंदेव त्यांची नित्य पूजा करीत असत. त्यामुळे त्या पादुका त्यांच्या कडगंची येथील घरातच ठेवलेल्या होत्या. पुढे म्हणजे तसे अलिकडे १९५५ मध्ये प. पू. श्रीगुरुनाथबाबा दंडवते महाराज कडगंचीला आले असताना त्यांच्या वंशजांनी त्यांना या पादुका दाखविल्या. त्यांनी या पादुकांचे नामकरण ‘करुणापादुका’ असे केले. या पादुका सध्या देवस्थानातील श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीजवळच ठेवलेल्या आहेत.” अशी माहिती श्री. शिवशरणप्पा मादगुंडी यांनी दिली. श्री. शिवशरणप्पा यांची बहुथोर पुण्याई अशी की, त्यांनी सायंदेवाच्या घराचे पुनरुज्जीवन करून तेथेच सध्याचे श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान झाले आहे.
No comments:
Post a Comment