*संकष्ट चतुर्थी*
बुद्धीची देवता, विद्येची देवता, ब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, गणांचा अधिपती, चौदा विद्या, चौसष्ट कलांचा स्वामी असलेल्या गणपीला हिंदू धर्मात अनन्य साधारण असे स्थान आहे. अनेक प्रकारे त्याची भक्ती केली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.
गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चारताच वातावरण एकदम आनंददायी, मंगलमय होते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते.
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. साधारणपणे एका वर्षात १२ आणि अधिकमास आल्यास १३ संकष्ट चतुर्थी येतात. गणपतीचे भक्त हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा करतात. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे.
संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत कोणाही करू शकते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. मिठाची संकष्ट चतुर्थी व पंचामृती चतुर्थी. या व्रतात दिवसभर उपवास करावा. उपवासानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे.
संकष्टी चतुर्थी उपवासाच्या नावावरुन हे स्पष्ट होते की हे व्रत समस्यांना पराभूत करणार आहे. असे मानले जाते की गणपती शुभफलदायक आहे. म्हणून हे व्रत ठेवल्याने सर्व त्रास दूर होतात आणि थांबलेली कामेही होतात. यामुळे घरात धन-संपत्ती येते.
No comments:
Post a Comment